तपासणी कॅम्प मधील सर्वच पॉझिटिव रूग्णांची नावे मयूर नगरात टाकल्याने एकच गोंधळ उडाला. अवघे तीन पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या या नगरातील रुग्णसंख्या एकदम १७ वर जाऊन पोहोचली. आधीच कडक निर्बंधांनी त्रस्त रहिवाशांनी यावर संताप व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर तातडीने खुलासा करण्यात आला.
मनपाने रॅपिड एंटीजन टेस्ट कॅम्प मयूर नगरात आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या रुग्णांना त्यांच्या मूळ पत्त्यावरील भागात दाखवणे सोडून प्रशासनाने हे सर्व रुग्ण मयूर नगरातील असल्याची नोंद घेतली. त्यामुळे अवघी तीन रुग्ण संख्या असलेल्या मयूर नगरचा आकडा तब्बल १७ वर जाऊन पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून मयुर नगरातील रुग्ण संख्या असल्याने या भागाला कंटेनमेंट झोन बनविले आहे. सर्व रस्ते बंद करून कडक निबंध घातले आहेत. त्यामुळे रहिवासी हैराण झाले. अशा परिस्थितीत प्रशासनाने या नगरातील रुग्ण संख्या १७ दाखवल्याने मोठा गोंधळ उडाला. रहिवाशांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर अधिकाऱ्यांना खुलासा करावा लागला. शहरात विविध भागात विशेषतः प्रवेश नाक्यांवर अँटीजेन टेस्टद्वारे कोरोनाची तपासणी केली जात आहे. मात्र त्यात काही नागरिक स्वतः चा मूळ पत्ता टाकायचे सोडून कॅम्प झालेल्या ठिकाणचा पत्ता टाकत आहेत. त्यामुळे सर्वच गोंधळ उडताना दिसतो. याशिवाय मनपा प्रशासनाकडून माहिती देताना पॉझिटिव्ह रुग्णांचे पत्ते देण्याचे सोडून कॅम्पचाच पत्ता जाहीर केला जात आहे. यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. असाच गोंधळ काल मयुरनगर च्या जाहीर केलेल्या आकडेवारी वरून झाला.
कॅम्पमध्ये आढळले होते १७ रुग्ण....
मयुरनगर मध्ये काल कॅम्प घेऊन कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्या कॅम्पमध्ये सतरा जण पॉझिटिव्ह आले होते. त्यात मयुरनगर येथील -३ रुग्ण तर जटवाडा -१, सुरेवाडी-३, सिडको एन-आठ श्रीनगर -१, गजानननगर एन-अकरा-६, पिसादेवी रोड-२, नवजीवन कॉलनी येथील-१ असे एकूण १७ रुग्ण आढळून आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मूळ पत्ता माध्यमांना द्यायला हवा
शहरात विविध ठिकणी कॅम्प घेण्यात येत आहेत. त्या ठिकाणी आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा मूळ पत्ता द्यायचे सोडून कॅम्प झालेल्या ठिकाणचा पत्ता दिला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहेत. आणि नागरिकांनी देखील कॅम्पचा पत्ता नव्हे तर मूळ पत्ता दिला तर संभ्रम निर्माण होणार नाही, असे बोलले जाते.














